
परवानगीविना टेरेस शेड उभारल्याचा ठपका; दोन नोटिसांनंतरही कारवाई न केल्याने महापालिकेने शेड केले निष्कासित
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील फ प्रभाग परिसरातील बाजीप्रभू चौक येथील ‘जिम्मी व्हेज रेस्टो लाऊंज’वर कल्याण-डोंबिवली महापालिकेने धडक कारवाई केली. गोल्डन प्लाझा इमारतीच्या आठव्या मजल्यावर सुरू असलेल्या या आस्थापनाच्या टेरेसवरील शेडला आवश्यक महापालिका व अग्निशमन विभागाची परवानगी नसल्याचे सुनावणीदरम्यान आढळून आल्याने महापालिकेने हे शेड निष्कासित केले.
महापालिकेच्या परवानगीविना व्यवसाय सुरू असल्याची तक्रार फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर बारमालक महेंद्र गांधी यांना आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीसाठी बोलावण्यात आले. सुनावणीदरम्यान टेरेस शेडसाठी नगररचना विभागाची तसेच अग्निशमन विभागाची आवश्यक परवानगी घेतल्याचे आढळून आले नाही.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर शेड अनधिकृत ठरवून ते स्वतःहून काढून घेण्याचे निर्देश दिले. मात्र, दोन नोटिसा बजावूनही संबंधितांकडून शेड हटवण्यात आले नाही.
अखेर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत आवश्यक पोलीस बंदोबस्तात शेड निष्कासनाची कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी ही कारवाई केली. यावेळी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे पथक प्रमुख राजू शेलार, नरेश भोईर तसेच ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अभिमन पवार यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, स्थानिक पालिका सदस्य रंजना पेणकर यांनीही या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. महापालिकेच्या या कारवाईमुळे परवानगीविना बांधकाम अथवा शेड उभारून व्यवसाय करणाऱ्यांना प्रशासनाचा स्पष्ट इशारा मिळाला आहे.






