डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील डॉ. राठ रोड, उर्सेकरवाडी आणि मधुबन टॉकीज परिसरात सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेच्या ‘ग’ प्रभागातील फेरीवाला निर्मूलन पथकाने धडक कारवाई केली.
नागरिकांची मोठी गर्दी असतानाही रस्त्यांमधून मार्ग काढत पथकाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचा माल जप्त केला. आजच्या कारवाईत तब्बल दोन टेम्पो भरून माल जप्त करण्यात आला.
सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कारवाईमुळे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सणासुदीच्या काळात अशाच प्रकारे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






