‘जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ हीच माझी खरी संपत्ती’ – माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याण : भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघांत तब्बल १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र पवार यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थकांकडून उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा पक्षाने त्यांच्यावर राजस्थानमधील महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविल्याने ते सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी घेता येत नसल्याने कार्यकर्त्यांनी वृक्षलागवडीच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, भिवंडी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, शहापूरमध्ये अशोक इरनक व भाजप पदाधिकारी यांच्या माध्यमातून, तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नरेंद्र पवार फाउंडेशन आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून वृक्षलागवड करण्यात आली.
राजस्थानमध्ये पक्षाची महत्त्वाची जबाबदारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींनी नरेंद्र पवार यांच्यावर राजस्थानमधील पाली नगरपरिषद निवडणुकीची महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार पवार सध्या राजस्थानमध्ये पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी कार्यरत आहेत.
यापूर्वीही पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविली होती. केरळमध्ये संघटनात्मक काम करताना त्यांनी पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राजस्थानमधील त्यांच्या कामगिरीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांची साथ हीच खरी संपत्ती’
वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी राबविलेल्या १० हजार वृक्षलागवडीच्या उपक्रमाबद्दल नरेंद्र पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ, बहिणींचा स्नेह आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी वाढदिवसानिमित्त सर्वांच्या भेटीगाठी घेण्याचा आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्याचा आनंद मिळतो. तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींच्या प्रेमाने आणि आपुलकीने साजरा होणारा स्नेहसोहळाही अनुभवता येतो. मात्र, यंदा राजस्थानमधील महत्त्वाची पक्षीय जबाबदारी असल्याने प्रत्यक्ष भेटीगाठी घेता येणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“मी प्रत्यक्ष उपस्थित नसलो, तरी आपले प्रेम, स्नेह, विश्वास आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहतील, हीच माझी अपेक्षा आहे,” असेही पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या १० हजार वृक्षलागवडीमुळे राजकीय शुभेच्छांसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.






