नागरिकांसाठी विरंगुळ्याचे नवे ठिकाण; कामाला वेग देण्याच्या आयुक्तांना सूचना
मुंब्रा : समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यात नागरिकांना निवांत क्षण अनुभवता यावेत, कुटुंबीयांसोबत वेळ घालवता यावा आणि विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू असलेल्या मुंब्रा रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाची पाहणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.
पाहणीदरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. चौपाटीच्या विकासकामातील उर्वरित कामे कोणत्याही प्रकारे रखडू नयेत, यासाठी कामाला आणखी वेग देऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांना दिल्या.
रेतीबंदर चौपाटीचा विकास पूर्ण झाल्यानंतर मुंब्रा परिसरातील नागरिकांना समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी, कुटुंबीयांसोबत विरंगुळ्याचे क्षण घालवण्यासाठी तसेच विविध उपक्रमांसाठी एक आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांना दर्जेदार मनोरंजनाची सुविधा मिळणार आहे.
पाहणीदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित युवा खेळाडूंसोबत व्हॉलीबॉल खेळत काही वेळ घालवला. लोकप्रतिनिधी आणि युवा खेळाडूंमधील हा उत्स्फूर्त संवाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, माजी नगरसेवक बालाजी काकडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चौपाटीचे काम पूर्णत्वास येत असल्याने आगामी काळात मुंब्रावासीयांसाठी समुद्रकिनारी विरंगुळ्याचे नवे आणि आकर्षक ठिकाण उपलब्ध होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.






