डोंबिवली : शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक मैदान असलेल्या नेहरू मैदानावरील अतिक्रमणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या मैदानावर अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामाला थारा देऊ नये, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
नेहरू मैदानावर करण्यात आलेले अतिक्रमण तातडीने हटवून मैदान पूर्ववत नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांना खेळ, व्यायाम तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी मैदानांची आवश्यकता असताना उपलब्ध सार्वजनिक जागांवर अतिक्रमण होणे ही गंभीर बाब असल्याचे मनसेने म्हटले आहे. मैदानाचा सार्वजनिक वापर अबाधित राहावा आणि भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“सार्वजनिक मैदानावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा मनसेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
नेहरू मैदानाच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन अतिक्रमण हटवावे, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी भूमिका घेतल्यास या प्रश्नाला आणखी राजकीय धार येण्याची शक्यता आहे.






