डोंबिवली : शहरातील मुख्य वर्दळीच्या आणि वाहतुकीच्या रस्त्यांवर राजकीय पक्षांकडून उभारण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या कमानींवर प्रतिबंध घालावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवर जाहिरातींच्या कमानी न उभारण्याच्या सूचना दिल्या.
रस्त्याच्या मध्यभागी अथवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी कमानी उभारल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढू शकतो. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या गणेशमूर्तींच्या वाहतुकीलाही अशा कमानींमुळे अडथळा निर्माण झाल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने सार्वजनिक हित आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यांवर कमानींना परवानगी देऊ नये, अशी भूमिका मांडली होती.
मनसेच्या या भूमिकेला प्रतिसाद देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचनांचे स्वागत करत मनसेचे शहराध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी त्यांचे आभार मानले. सार्वजनिक रस्ते नागरिकांच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी असून, सर्वच राजकीय पक्ष व संस्थांनी याबाबत जबाबदारीने भूमिका घ्यावी, असेही पाटील यांनी म्हटले.






