डोंबिवली : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासोबत कल्याण-डोंबिवलीतील हजारो भगिनींनी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा केला. महिलांनी ‘जीवाभावाचा रविदादा’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत रविंद्र चव्हाण यांच्या मनगटावर राखी बांधून स्नेहाचे बंध अधिक दृढ केले.
डोंबिवलीतील न्यू फोर्स अकॅडमीमध्ये सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींचीही या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विविध वयोगटातील भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते.
डोंबिवली-कल्याणमध्ये दिवसभर रक्षाबंधनाचा उत्साह
रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली आणि कल्याण परिसरात दिवसभर विविध ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे, तर दुपारी सम्राट चौक येथील जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन सोहळा पार पडला.
जनसंपर्क कार्यालयात शेकडो महिलांनी उपस्थित राहून रविंद्र चव्हाण यांना राखी बांधली. यावेळी महिला भगिनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. राखीच्या पवित्र धाग्यातून जपलेला स्नेह आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.






