
कल्याण पूर्व, दि. २९ : रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यास कसा करावा, शिकलेले लक्षात कसे ठेवावे आणि बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर संगोष्ठीचे आयोजन चेतना इंग्लिश हायस्कूल येथे करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या वीणा सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रेरणादायी वक्ते व माइंडसेट गुरु दिनेश गुप्ता ‘आनंदश्री’ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कमी वेळेत प्रभावी व गुणवत्तापूर्ण अभ्यास करण्याच्या पद्धती, अवघड विषय सोप्या पद्धतीने समजून घेण्याचे तंत्र, अभ्यासलेला विषय दीर्घकाळ स्मरणात ठेवण्याच्या विविध क्लृप्त्या तसेच बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.
केवळ जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा योग्य पद्धतीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, असा संदेश दिनेश गुप्ता ‘आनंदश्री’ यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या अनोख्या आणि रंजक शैलीत त्यांनी विविध अध्ययन तंत्र समजावून सांगत विद्यार्थ्यांचे मनोरंजनही केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲपचे मोफत वाटप
विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून अभ्यासासाठी अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कार्यक्रमात सुमारे ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲपचे मोफत वाटप करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य तसेच शिकण्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे रोटेरियन सचिन चौबे, रो. पल्लवी चौधरी, रो. मुंशीर मलिक, रो. निशिगंधा संदीप वनसूत्रे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त मार्गदर्शन आणि डिजिटल साधनांची जोड देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






