५०० विद्यार्थ्यांची अभ्यासिका, डिजिटल लॅबपासून मराठी भाषा संशोधन केंद्रापर्यंत सुविधांचा प्रस्ताव
कल्याण : मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल युगात वाढणाऱ्या ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’च्या गरजा लक्षात घेऊन कल्याण पूर्वेत अद्ययावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉलेज सेंटर उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी तरुणाई आणि विद्यार्थ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. ३० ऑगस्ट रोजी आयोजित मेळाव्यात खासदारांनी तरुण-तरुणींशी साधलेल्या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गरजा आणि अडचणी थेट मांडल्या.
कल्याण पूर्वेत गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी भव्य आणि सर्व सुविधांनीयुक्त सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नसल्याने अभ्यासासाठी खासगी अभ्यासिकांचा आधार घ्यावा लागत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. वाढती स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता अभ्यासासाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा असलेले केंद्र काळाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या नॉलेज सेंटरमध्ये एकाच वेळी ५०० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल अशी अद्ययावत अभ्यासिका, भव्य ग्रंथालय, डिजिटल कॉम्प्युटर लॅब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मराठी भाषा संशोधन केंद्र, वाचन केंद्र, न्यूज पेपर लाउंज आणि मेडिटेशन सेंटर अशा विविध सुविधांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
हे केंद्र चिंचपाडा, नांदिवली, आडीवली-मानेरे आणि द्वारली परिसरातील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होईल, अशा मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात यावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. केवळ ग्रंथालय नव्हे, तर शिक्षण, स्पर्धा परीक्षा, डिजिटल कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी एकाच छताखाली सुविधा देणारे ज्ञानकेंद्र उभारण्याची संकल्पना विद्यार्थ्यांनी खासदारांसमोर मांडली.
विद्यार्थ्यांची मागणी गांभीर्याने घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉलेज सेंटर उभारण्यासाठी आवश्यक निधी, परवानग्या आणि प्रशासकीय मदतीसाठी शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे कल्याण पूर्वेतील विद्यार्थ्यांच्या बहुप्रतीक्षित ज्ञानकेंद्राच्या मागणीला आता सकारात्मक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
खासदारांच्या सूचनेनुसार विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, शहरप्रमुख निलेश शिंदे, अभिजित दरेकर, लोकसभा समन्वयक डॉ. सतीश मुंबरकर आणि दुर्गेश बागुल यांनी विद्यार्थ्यांशी समन्वय साधून या प्रकल्पासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.






