आंतरमहाविद्यालयीन उत्सवात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कल्याण : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि क्रीडाकौशल्याला नवे व्यासपीठ देणारा ‘क्षितिज (KSHITIJ) Presents – Intercollegiate Events’ आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक व क्रीडा उत्सव २०२६-२७ शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात उत्साहात पार पडला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

उत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य अनुजा ब्रह्मा आणि IQSC समन्वयक अजय पिल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपल्या कलागुणांचे आणि कौशल्याचे दर्शन घडविले.
सांस्कृतिक विभागात लोकनृत्य, ग्रुप डान्स, स्केचिंग, लिप्पन आर्ट, कंटेंट रायटिंग, अॅड-मॅड शो, स्टोरी टेलिंग आणि मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला या स्पर्धांमधून मुक्त वाव मिळाला.
क्रीडा विभागात Chess, Carrom आणि Volleyball या स्पर्धांनी उत्सवात रंगत आणली. मैदानावरील चुरशीच्या लढतींसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडाभिमुखता आणि संघभावना दाखवून दिली.
‘क्षितिज’च्या माध्यमातून विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र येत आपली कला, प्रतिभा आणि क्रीडागुण सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि नव्या मैत्रीपूर्ण संवादासाठीही महत्त्वपूर्ण ठरला.






