श्री साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य आगमन सोहळा
डोंबिवली : श्री साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने डोंबिवलीचा मानाचा आणि नवसाला पावणारा ‘जाधववाडीचा महाराजा’ यांचा भव्य आगमन सोहळा सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता डोंबिवली पश्चिमेतील द्वारका हॉटेलजवळ मोठ्या उत्साहात पार पडला. मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आगमन सोहळ्याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गणरायाच्या आगमनासाठी श्री साईनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. बाप्पाचे आगमन होताच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तिमय वातावरणामुळे आगमन सोहळ्याला विशेष रंगत आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी उपस्थित गणेशभक्त तसेच नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
‘जाधववाडीचा महाराजा’च्या दर्शनासाठी डोंबिवली पश्चिम तसेच परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या भव्य आगमन सोहळ्याने डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली.






