कल्याण : हिंदू रितीरिवाज आणि धार्मिक परंपरेनुसार मांगलिक खांब पूजन, नवरात्रोत्सव मंडप भूमिपूजन तसेच धर्मध्वज उभारणी व पूजनाने यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात झाली. आई जगदंबेच्या भक्तीने दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणारा हा नवरात्रोत्सव यंदाही भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

सोमवार, २१ तारखेला परम श्रद्धेय आचार्य ह.भ.प. श्री. प्रल्हाद महाराज शास्त्री आणि आमदार श्री. राजेश मोरे यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. मांगलिक खांब पूजन, मंडप भूमिपूजन आणि धर्मध्वज उभारणीच्या विधींना उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी परिसरात जयघोष आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, परंपरा, संस्कृती आणि उत्साहाचा सुंदर संगम मानला जातो. यंदाच्या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच भोंडला, मंत्रपुष्पांजली, कमलपुष्प अर्पण तसेच महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आई जगदंबेच्या भक्तीने संपूर्ण परिसर भक्तिमय करण्यासोबतच महिला आणि नागरिकांना सांस्कृतिक परंपरांशी जोडणारे विविध उपक्रम यंदाच्या उत्सवात राबविण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
मंडप पूजनाच्या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधी उत्साहात पार पडल्याने आगामी नवरात्रोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.






