सेवा संकल्प अभियान व मिशन ग्रीन केडीएमसी अंतर्गत उपक्रम; बीपीसीएलकडून तीन वर्षे देखभाल व ठिबक सिंचनाची व्यवस्था
कल्याण : सेवा संकल्प अभियान तसेच मिशन ग्रीन केडीएमसी अंतर्गत नेतिवली टेकडीवर तब्बल ३० हजार झाडे लावण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षारोपणाची ही मोहीम शहरातील हरित पर्यटनाला चालना देणारा चांगला संदेश ठरेल, असे प्रतिपादन महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी यांनी केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि बीपीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महापालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘शहर आपले घर; ते हिरवे ठेवणे आपले कर्तव्य’
यावेळी बोलताना महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी, ‘आपले शहर हे आपले घरच आहे. ते स्वच्छ, सुंदर आणि हिरवे ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,’ असे सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यार्थी तसेच नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार सुलभाताई गायकवाड यांनीही यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.

बीपीसीएलकडून तीन वर्षे वृक्षांची देखभाल
मिशन ग्रीन केडीएमसी अंतर्गत नेतिवली टेकडीवर ३० हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाचा हा प्रारंभ असून, बीपीसीएलच्या सीएसआर निधीतून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बीपीसीएलकडून पुढील तीन वर्षे या वृक्षांची देखभाल करण्यात येणार असून, ठिबक सिंचनाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
नेतिवली टेकडी हिरवीगार झाल्यास येथे ऑक्सिजन पार्क उभारण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. या वृक्षांमुळे शहराच्या हरित क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान एक झाड लावावे, असे आवाहन आयुक्त गोयल यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी, आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नेतिवली टेकडीवर वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सारिका जाधव, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त रामदास कोकरे, सुषमा मांडगे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, बीपीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक अशोक चौधरी, महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे, सीनियर मॅनेजर अरविंद भक्त, समृद्धी संस्थेचे अध्यक्ष शांताराम माने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, पालिका सदस्य, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी केले.
शाश्वत कचरा वर्गीकरण मोहिमेलाही प्रारंभ
याच कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत शाश्वत कचरा वर्गीकरण मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला. कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण करून त्याचे वारानुसार संकलन करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्वच्छतेची शपथही देण्यात आली.
केडीएमसीच्या या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत घराघरांतच ओला व सुका कचरा वेगळा करण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुलभ होण्याबरोबरच पुनर्वापराला चालना मिळणार आहे.
कचरा देताना नागरिकांना आर्थिक मोबदला
सुका कचऱ्यातील कागद व प्लास्टिकसाठी प्रतिकिलो दोन रुपये, ई-वेस्टसाठी प्रतिकिलो आठ रुपये तसेच इतर भंगारासाठीही मोबदला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कचरा योग्य पद्धतीने वर्गीकृत करून देणाऱ्या नागरिकांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे.
नागरिकांना थेट आर्थिक मोबदला देऊन शाश्वत कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देणारा हा प्रयोग इतर शहरांसाठी आदर्श ठरू शकतो. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती वाढून कल्याण-डोंबिवली शहर अधिक स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक होण्यास मदत होईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.
पर्यावरण संवर्धनासह स्वच्छतेचा संदेश
वृक्षारोपण आणि शाश्वत कचरा वर्गीकरण या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. नेतिवली टेकडीवरील वृक्षलागवडीमुळे शहराच्या हरित क्षेत्रात भर पडण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला दीर्घकालीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.






