८६ बाधितांचे स्थलांतर सुरू; १०० हून अधिक बांधकामे हटविण्याची प्रक्रिया
डोंबिवली : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामातील महत्त्वाचा अडथळा दूर होण्याच्या मार्गावर आहे. पुलामुळे बाधित होणाऱ्या ८६ रहिवाशांचे स्थलांतर सुरू झाले असून, रहिवाशांची घरे रिकामी झाल्यानंतर अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे.

रहिवाशांचे स्थलांतर सुरू
केडीएमसी अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या आठ दिवसांपासून स्थानिक पालिका सदस्य शारदा चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बाधित रहिवाशांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही रहिवाशांनी स्वतःहून बारावे आणि खंबाळपाडा येथील बीएसयूपी प्रकल्पात स्थलांतर केले आहे.
पुलाच्या कामामुळे ८६ घरे बाधित होत असून, त्याव्यतिरिक्त ३८ घरे पुनर्वसनाच्या निकषात बसत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूण १०० हून अधिक बांधकामे हटवावी लागणार आहेत.
५० टक्के काम पूर्ण
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या एकूण कामापैकी सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे प्रसाद ठाकूर यांनी सांगितले. विठ्ठल चौधरी चाळीतील रहिवाशांनी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली असून, ती मुदत पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागामालकांच्या मोबदल्याचा प्रश्न वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन मार्गी लावण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर म्हसोबा चौक ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यानची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचेही सांगण्यात आले असून, आवश्यक जागा मोकळी झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
“माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या आठ दिवसांपासून स्थानिक पालिका सदस्य शारदा चौधरी मॅडम तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बाधित रहिवाशांशी संवाद साधून त्यांना बीएसयूपी योजनेतील पुनर्वसनासाठी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले. रहिवाशांनीही सहकार्य करत स्वतःहून आपले सामान स्थलांतरित केले आहे.या प्रकल्पात ८६ घरे बाधित होत असून, त्याव्यतिरिक्त ३८ घरे पुनर्वसनाच्या निकषात बसत नाहीत. शंभरहून अधिक घरे पाडण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रकल्पाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. विठ्ठल चौधरी चाळीतील रहिवाशांनी दोन दिवसांची मुदत मागितली असून, ती मुदत संपल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल. जागामालकांचा प्रश्न वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन मार्गी लावण्यात येणार आहे.”
— प्रसाद ठाकूर, केडीएमसी अधिकारी






