कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर परराज्यात जाणाऱ्या गरजू आणि अल्पवयीन प्रवाशांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका चतुर भामट्याला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. १० रुपयांच्या साध्या प्लॅटफॉर्म तिकिटावर फेरफार करून ते ५१० रुपयांचे एक्स्प्रेस तिकीट असल्याचे भासवून प्रवाशांना लुटणाऱ्या अतुल अडलिंगे या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांतच गजाआड केले.
मार्कर पेनने केली तिकिटात फेरफार
पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाण्यासाठी सारीकुल दिल मोहम्मद शेख हा अल्पवयीन प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशनवर आला होता. तो तिकिटासाठी गरजू असल्याचे पाहून आरोपी अतुल अडलिंगे याने त्याचा विश्वास संपादन केला. आरोपीने त्याला हावडाचे तिकीट काढून देतो असे सांगून रेल्वे खिडकीवरून केवळ १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट काढले. त्यानंतर त्याने मोठ्या हुशारीने मार्कर पेनचा वापर करून त्या १० रुपयांच्या तिकिटावर ‘५’ हा अंक अधिक लिहिला आणि ते ५१० रुपयांचे तिकीट असल्याचे भासवले. भोळ्या प्रवाशानेही त्यावर विश्वास ठेवून आरोपीला ५१० रुपये दिले.
पोलिसांची तत्परता; १५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने ठोकल्या बेड्या
तिकीट हातात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी सारीकुल शेख याच्या लक्षात आले. त्याने वेळ न दवडता तातडीने कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक (WPI) अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ १५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात शोधमोहीम राबवून अवघ्या काही तासांतच आरोपी अतुल अडलिंगे याला हुडकून काढून अटक केली.
रेल्वे पोलिसांचे प्रवाशांना आवाहन
कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीची पुढील चौकशी सुरू आहे. रेल्वे स्टेशनवर तिकीट काढताना किंवा प्रवास करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, तसेच तिकीट केवळ अधिकृत रेल्वे तिकीट खिडकी किंवा एटीव्हीएम (ATVM) मशीनवरूनच काढावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी प्रवाशांना केले आहे.






