डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत डोंबिवलीत शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजू पाटील यांनी मनसे वैद्यकीय कक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा केली. तसेच डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी लवकरच मनसेच्या वतीने दिव्यांग सेलची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
मनसेत प्रवेश करणाऱ्यांना इतर पक्षांच्या तुलनेत अधिक सन्मान मिळतो, असा दावा करत राजू पाटील यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रात मदत मिळावी, यासाठी मनसे वैद्यकीय कक्षाची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसेच्या कार्यालयासाठी निधी उभारणीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा
मनसेचे कार्यालय उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सूचना केली होती. त्यावर बोलताना राजू पाटील यांनी, “आपल्याकडे मेहनतीचा पैसा आहे; बड्या कंपन्या आमच्या पक्षाला डोनेशन देत नाहीत,” असा टोला लगावत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरूनही सत्ताधाऱ्यांना घेरले
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला मनसेने सुरुवातीपासून समर्थन दिल्याचा दावा राजू पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यांना मराठवाड्यात पाठवण्यासाठी मदत केल्याचे, तसेच राज ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी जाऊन सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या प्रभावाचा अंदाज आल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी त्यांना पुन्हा आश्वासने देऊन त्यांचा राजकीय वापर केल्याचा आरोप करत, “राजकारणी निगरगट्ट आहेत,” असा घणाघात राजू पाटील यांनी केला.
यावेळी मनसेच्या आगामी संघटनात्मक विस्ताराचे संकेत देतानाच विविध सामाजिक उपक्रमांवरही भर देण्यात आला.






