कडक अटींसह सुटका होणार
डोंबिवली : डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावर कडक अटी आणि शर्ती लावत जामीन मंजूर केला आहे.
रमेश म्हात्रे सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आहेत. जामिनाची कागदपत्रे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुटकेच्या वेळी समर्थक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दरम्यान, न्यायालयाने जामीन देताना म्हात्रेंवर अनेक महत्त्वपूर्ण निर्बंध घातले आहेत. चार्जशीट दाखल होईपर्यंत त्यांना महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार असून, ते कुठे वास्तव्यास आहेत याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. तसेच प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे, प्रसारमाध्यमांशी संवाद न साधणे अशा विविध कडक अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
त्यामुळे जामीन मंजूर झाला असला तरी न्यायालयाच्या कठोर अटींच्या चौकटीतच रमेश म्हात्रेंना पुढील काळ घालवावा लागणार आहे. आता त्यांच्या कारागृहातून होणाऱ्या सुटकेकडे समर्थकांसह पोलिसांचेही लक्ष लागले आहे.






