कल्याण : मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने आधारवाडी कारागृहातच थांबावे लागलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार जणांची अखेर शनिवारी सायंकाळी कारागृहातून सुटका झाली.
रमेश म्हात्रे यांच्यासह प्रमोद निकम, रमेश पवार आणि अक्षय करांडे यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, शनिवारी सुट्टी असल्याने जामीन प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि जेल मोमोची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे न्यायालयाकडून जामीन मंजूर होऊनही त्यांची सुटका लांबली होती.
दरम्यान, रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. कागदपत्रांची पूर्तता आणि जेल मोमोची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास चौघांची आधारवाडी कारागृहातून सुटका करण्यात आली.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, “मला उच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे,” असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर ते आपल्या वाहनातून कारागृह परिसरातून रवाना झाले.
महाराष्ट्रातून तडीपारी; गोव्यात राहण्याचे निर्देश
दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासमोर आता तडीपारीच्या आदेशामुळे महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट आहे. त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करण्यात आल्याने चार्जशीट दाखल होईपर्यंत गोव्यात राहावे लागणार असल्याची माहिती आहे.
गोव्यात ज्या परिसरात ते वास्तव्यास राहतील, त्या परिसरातील संबंधित पोलीस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावण्याची अट त्यांच्यावर असणार आहे.
त्यामुळे उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर आधारवाडी कारागृहातून सुटका झाल्यानंतरही रमेश म्हात्रे यांच्यावरील कायदेशीर निर्बंध कायम राहणार असून, पुढील काळात त्यांना गोव्यातूनच कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.






